कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर अंत्यसंस्कार : धक्कादायक प्रकार .
कडेगाव - खेराडे वांगी (ता. कडेगाव) येथे एका 35 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.तर संबंधित मयत व्यक्ती ही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे काल बुधवारी (ता.22) माहिती मिळाल्यानंतर खेराडे वांगी गावातील 30 जणाना संस्थात्मक क्वारंन्टाईन केले असून त्यांना कडेगाव येथे शासकीय वसतिगृहात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून सर्वांचे आज स्वॅब घेण्यात आले.
खेराडे वांगी गावातील एकजण मुंबई येथील एका हॉस्पिटल मध्ये ह्रदयाच्या उपचारासाठी 17 एप्रिल रोजी दाखल झाले होते.तर 18 एप्रिल राजी त्यांचे निधन झाले.त्यानंतर संबंधितांच्या पत्नींने त्याचदिवशी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचा मृतदेह मुंबईहून रुग्ण वाहिकेतून खेराडे-वांगी येथे आणला व नातेवाईकांनी येथे मृतदेहावर 19 एप्रिलला अंत्यसंस्कार केले, परंतु काल बुधवारी (ता.22) दुपारी संबंधिताच्या पत्नीने मुंबईतील संबंधित हॉस्पिटलमध्ये फोन करुन विचारले असता सदर मयत पतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला असल्याचे त्यांना समजले.त्यानंतर त्यांनी याबाबत येथील तालुका प्रशासनास सांगितले. त्यानंतर तालुका प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागा झाला तर खेराडे वांगीसह तालुक्यातील प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले
याबाबत प्रांताधिकारी गणेश मरकड कडेगाव तहसीलदार डॉ.शैलजा पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक वायदंडे यांनी तात्काळ गावास भेट देऊन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या 30 व्यक्तींना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले.तर खेराडे वांगीसह तीन किलोमीटर पर्यंतचे क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र केले असून येथे शंभर टक्के लॉक डाऊन केले आहे.तर खेराडे वांगी येथील प्रकाराने तालुक्यातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.