शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने पूर्णपणे उघडली.
सांगली - शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्वच दुकाने शुक्रवारी खुली झाली. त्यामुळे पुन्हा एकदा बाजारपेठ गजबजली. कोरोनाची धास्ती मनात घेऊनच व्यापाऱ्यांनी व्यवसायाचा नव्याने शुभारंभ केला. मात्र दुपारनंतर ग्राहकांची गर्दी बऱ्यापैकी ओसरली होती. गणपती पेठेत मात्र दिवसभर रेलचेल होती. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती. तब्बल दीड महिन्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने पूर्णपणे उघडली होती. तसे गत सोमवारपासूनच बाजारपेठेतील दुकाने उघडण्यास सुरूवात झाली होती. जिल्हा प्रशासन व महापालिकेने एक दिवसाआड एका बाजूची दुकाने उघडण्यास परवागनी दिली होती. तेव्हा पहिल्याच दिवशी विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती. बहुतांश दुकानात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासण्यात आला होता. नागरिकांच्या बेशिस्तीमुळे बाजारपेठेत वाहतुकीचीही कोंडी झाली होती.