बेकायदेशिर मद्यविक्री प्रकरणी दोन मद्यविक्री आस्थापना कायमस्वरूपी रद्द - अधिक्षक किर्ती शेडगे

बेकायदेशिर मद्यविक्री प्रकरणी
दोन मद्यविक्री आस्थापना कायमस्वरूपी रद्द
- अधिक्षक किर्ती शेडगे


सांगली, -  कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे संचार बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई दारूबंदी कायदा 1949 अन्वये मंजूर असणाऱ्या सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याबाबत आदेश असताना याचे उल्लंघन करून चोरट्या पध्दतीने बेकायदेशिरपणे मद्यविक्री करण्यासाठी अनुज्ञप्त्यी सुरू ठेवल्यामुळे सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील हॉटेल न्यू राजभवन इस्लामपूर ही परवानाकक्ष अनुज्ञप्ती व जत तालुक्यातील देशी दारू दुकान सीएल ३ क्र. 03 शेगाव या मद्यविक्री अस्थापना कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक किर्ती शेडगे यांनी दिली. 
लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेऊन शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध तसेच भेसळयुक्त मद्यविक्री, हातभट्टी विक्री तसेच मद्याचा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा मद्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय व हानी होवू शकते. तरी नागरिकांनी अशा प्रकारच्या मद्याची खरेदी अथवा सेवन करू नये. तसेच अशा मद्याची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्वरीत राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती द्यावी, असे आवाहन अधिक्षक किर्ती शेडगे यांनी केले आहे.